फैजपूर न.पा. हद्दवाढीची अधिसूचना प्राप्त : नागरिकांना दिलासा

faijpur area

फैजपूर, प्रतिनिधी | शहराच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचना दि.४ नोव्हेंबर रोजी जाहीर झाली असून अंतिम अधिसूचनेचे शासनाचे राजपत्र येथील नगर पालिकेला आज (दि.६) प्राप्त झाले आहे. त्यामुळे शहरातील वाढीव भागातील नागरिकांना मोठा दिलासा लाभला आहे.

 

शहरातील हद्दीबाहेरील रहिवाशी वस्त्या शहर हद्दीत समाविष्ट व्हाव्या, यासाठी पालिकेकडून तत्कालीन नगराध्यक्षा अमिता हेमराज चौधरी यांच्या सन २०१२-१३ च्या कार्यकाळात हद्द वाढीचा प्रस्ताव सादर करून पदाधिकारी व पालिका प्रशासनाकडून शासन दरबारी पाठपुरावा करून वारंवार निघत असलेल्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. दरम्यान शहर सुधारित हद्दवाढीच्या विषयाला दि.४ फेब्रुवारी २०१९ रोजी विद्यमान नगराध्यक्षा महानंदा रवींद्र होले अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या पालिकेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली.

या विषयाला शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडून तत्काळ मंजुरी मिळावी, यासाठी पालिका प्रशासनाच्या बांधकाम विभागाकडून शहर हद्दवाढीच्या प्रस्तावासाठी लागणारे नकाशा व अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येऊन शहराच्या हद्दवाढीच्या अधिसूचनेची उद्घोषणा जाहीर झाल्याचे अधिसूचनेचे राजपत्र पालिकेला दि.२ मार्च २०१९ रोजी प्राप्त झाले होते. ही घोषणा राजपत्रात प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांचे आत दि.१ एप्रिलपर्यंत हरकतीसाठी मुदत देण्यात आली होती.

या राजपत्रात शहराच्या हद्दीत समाविष्ट करायच्या स्थानिक क्षेत्राचा तपशील देण्यात आला होता. त्यानुसार शहराच्या हद्दवाढीची अंतिम अधिसूचनेचे शासनाचे राजपत्र फैजपूर पालिकेला आज दि.६ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले आहे. दरम्यान शहराची पूर्वीची हद्दवाढ तीन क्वेअर कि.मी आहे तर २.८३ क्वेअर कि.मी. इतके क्षेत्र हद्दवाढ झाले असून नवीन शहर हद्दीचे क्षेत्र ५.८४ क्वेअर कि.मी. इतके झाले आहे. त्यामुळे शहराच्या हद्दवाढ भागांचा विकास होणार आहे शिवाय पालिकेकडून अत्यावश्यक सोई सुविधा उपलब्ध होणार असल्याने शहर विकासात भर पडणार आहे व पालिकेच्या विविध करापोटी पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे
.

Protected Content