फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । अनाथांची माता म्हणून ख्यात असणार्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचा निराधारांसाठीचा आश्रम सध्या लॉकडाऊनमुळे संकटात आला असतांना त्यांनी माहेर मानलेल्या फैजपुरातून माईंसाठी मदतीचे हात पुढे आले आहेत. यासाठी मसाकाचे संचालक नरेंद्र नारखेडे यांनी पुढाकार घेतला आहे.
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी समाजातील निराधार बालकांचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पीत केले आहे. आजपर्यंत सुमारे १००० मुले सज्ञान होऊन बाहेर पडले आहे. पुण्याजवळील मांजरी बुद्रुक शिवारात माईंचे मनशांती छात्रालय असून येथे ५० मुले आश्रयास आहे. सासवड येथील केंद्रात ७५ मुली व शिरुर येथील केंद्रात ५० मुले, चिखलदार येथे ७५ मुली, वर्धा येथे २५० भाकड गायी असून या सर्वांचा पालन पोषणांचा खर्च भागवावा लागतो. सध्या कोरोनामुळे माईंचे सर्व कार्यक्रम बंद असल्यामुळे, आर्थिक मदतीचा ओघ थांबल्यामुळे या निराधार बालसंगोपन केंद्राकरीता किराणा व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सिंधूताई सपकाळ यांच्या पूर्वायुष्यातील बराचसा भाग फैजपूरसह परिसरात गेलेला असून फैजपूर हे माईंनी माहेर मानले असून भावनिक नाते जुळले आहे. या अनुषंगाने माईंना फैजपूर शहरवासीयांनी मदतीचा हात देण्याचे ठरविले असून तातडीने १ लाख २१ हजार रक्कम पाठवली गेली आहे. याकरीता म.स.सा.का. संचालक नरेंद्र नारखेडे यांनी पुढाकार घेवून मित्र परिवार व सहकारी संस्थांचे मदतीने या निराधारांना आधार देण्याचे ठरविले आहे.
या कार्याकरीता सातपुडा अर्बन सहकारी पतसंस्था, कै. देविदास टिकाराम चौधरी नागरी सह. पतसंस्था, श्री. लक्ष्मी नागरी सह. पतसंस्था, कै. दादासाहेब वसंतराव पाटील औद्योगिक सह. संस्था यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत यामध्ये केली असून नरेंद्र नारखेडे, अनिल नारखेडे यांचे परिवारासह मित्रमंडळींनी सुध्दा ५१ हजारांची मदत केली आहे.
या कार्याकरीता औद्योगिक वसाहत चेअरमन मनोजकुमार पाटील, प्रांताधिकारी कैलास कडलग, सातपुडा अर्बनचे व्हा.चेअरमन चंद्रशेखर चौधरी, अंबिका दुध डेअरीचे चेअरमन हेमराज चौधरी, डॉ. पद्माकर पाटील, पांडुरंग सराफ, विलास नेमाडे, जयप्रकाश चौधरी, अनिल नारखेडे, नितीन चौधरी, अप्पा चौधरी, विजयकुमार परदेशी, निळकंठ सराफ, खेमचंद नेहेते, गिरीश पाटील, किरण चौधरी, पत्रकार योगेश सोनवणे यांचेसह असंख्य मित्र परिवाराचे सहकार्य लाभत आहे.
दरम्यान, समाजातील दात्यांनी सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमासाठी मदत करावी असे आवाहन मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांनी केली आहे. या संदर्भात कुणीही आश्रमाचे स्वयंसेवक विनय सपकाळ यांच्याशी ९०४९४७४५४४ व ८६००७६००१४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.