फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । तालुक्यातील श्री क्षेत्र डोंगरदे येथे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते गोवर्धन पूजा उत्साहात पार पडली.
तपस्थळी व जागृत देवस्थान म्हणून ख्यात असणार्या डोंगरदे येथे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते गोवर्धन पूजा पार पडली. याप्रसंगी स्वामी स्वरूपानंद महाराज व ह.भ.प. गुरव महाराज यांच्यासह भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
याप्रसंगी जनार्दन हरीजी महाराज म्हणाले की, ज्याप्रमाणे गोकुळात अतिवृष्टी व दुष्काळाच्या तिव्रतेमुळे गोकुळ वासीयांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी समस्त गोकुळ वासीयांना गोवर्धन पर्वतास शरण जाण्याचा उपदेश केला. मानवी जीवनावर येणार्या प्रत्येक नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी पर्वतराज नेहमी सक्षम ठरल्याची शिकवण आपल्या संस्कृतीत आपल्याला मिळालेली असून त्याप्रमाणेच आज आपल्यावर येणार्या दुष्काळ, पाऊस न येणे आदी सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर पडायचे असेल तर आपल्या गोवर्धनरुपी सातपुडा पर्वतास शरण जाऊन येथे जलसंधारण, वृक्षारोपण आदी कामे केल्यास हाच सातपुडा आपल्या परिसरास सर्व नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यास सक्षम आहे. तसेच पुढील वर्षांपासून या गोवर्धन पूजेच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याचा संकल्प समस्त नागरिकांनी करावा असे महाराजांनी आशीर्वाचनात महाराजांनी नमूद केले.
याप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज व स्वरूपानंद महाराज यांचे हस्ते पर्वतराजाची आरती करून ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात आले.