सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचालींना वेग आला आहे. निवडणूक नियोजन, उमेदवार निवड आणि संघटनात्मक तयारीसाठी पक्षातर्फे एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत पक्षाच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा होणार आहे.

ही बैठक दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी फैजपूर येथील मौलाना आझाद कॉम्प्लेक्स, सुपर ऑटो पार्टसमोर पार पडणार आहे. फैजपूर शहरातील सर्व पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना आपले अर्ज भरून शहराध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्षांकडे जमा करण्यास सांगितले असून, नावनोंदणीसाठी १००० रुपयांची फी निर्धारित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुपर ऑटो पार्ट येथे उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बैठकीस रावेर लोकसभा अध्यक्ष उमेश नेमाडे, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष हाजी हारून सेठ तसेच जिल्हा उपाध्यक्ष शेख नासिर हुसेन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बैठकीचे आयोजन रावेर लोकसभा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शेख कुर्बान शेख करीम आणि फैजपूर शहराध्यक्ष शेख रज्जाक शेख इक्बाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
फैजपूर शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकटपणे उतरावा, तसेच शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व उभे करावे, हा या बैठकीचा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून निवडणूक नियोजनात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



