फैजपूर, प्रतिनिधी । कत्तलीसाठी फैजपूर येथे आलेल्या एका मोठ्या कंटेनरमध्ये कोंबून आणलेल्या ३४ गुरांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा बाराच्या दरम्यान उघडकीस आली. फैजपूर पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी फैजपुर पोलिसात कंटेनर चालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यात १० लाखाचा ट्रॅक तर ६ लाख ७२ हजाराचे मृत अवस्थेतील गुरे पोलिसांनी जप्त केली. मृत गुरांचे शवविच्छेदन करीत जळगाव येथील बाफना गोशाळेच्या आवारात त्यांचा दफनविधी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कंटेनर क्र यूपी २१ बीएन ३०७१ यामध्ये कोणताही परवाना नसतांना कत्तलीच्या उद्देशाने आणलेले ३४ गुरे त्यामध्ये ३२ बैल व २ गाई या बुधवारी रात्री १२.१५ वाजेला फैजपूर येथील खिरोदा रोडवरील फिल्टर हाऊसच्या समोरील मोकळ्या जागेत बांधून आणलेले ३४ गुरे ही उतरविण्यात आली. या गुरांना निर्दयीपणे कोंबून आणलेले असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती सपोनि प्रकाश वानखडे, पीएअसाय शेख मसूद व पोकॉ उमेश चौधरी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदरचा कंटेनर ताब्यात घेत मृत गुरांचा पंचनामा व शवविच्छेदन करून जळगाव येथील बाफना गोशाळेच्या आवारात दफन विधी करण्यात आला. या घटनेप्रकरणी पोकॉ उमेश चौधरी यांनी फिर्याद दिल्यावरून कंटेनर चालक मुनने खान प्यारेलाल (रा. इस्लाम नगर उत्तर प्रदेश), सलीम शब्बीर तडवी, शेख साजिद शेख सगीर खाटीक दोघे (रा.फैजपूर), शेख कालु शेख यासिन( रा. वरणगाव) शेख बिलाल शेख अय्युब (रा. सावदा) या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल आला आहे.पोलिसांनी कंटेनरसह चालकास ताब्यात घेतले आहे. घटनेचा तपास एपीआय प्रकाश वानखडे, पीएसआय उमेश चौधरी करीत आहे.