फैजपूर येथे लोकसेवक मधुकरराव चौधरी यांना अभिवादन

balasaheb punyatithi

फैजपूर प्रतिनिधी । मनाचे औदार्य, राजकारणातला सच्चेपणा, कुशल संघटक, उत्कृष्ट संसदपटू, निष्कलंक चारित्र्य, वंचितांच्या कल्याणार्थ आयुष्य समर्पित करणारे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रध्देय कै. लोकसेवक मधुकरराव चौधरी, असे गौरवउद्गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा अभिनव शिक्षण प्रणाली राबिवणारे परभणी येथील स्वप्न भूमीचे संचालक सुर्यकांत कुलकर्णी यांनी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात (दि.८ जुलै) रोजी कै. मधुकरराव चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त मधुस्नेह परिवारातर्फे अभिवादन सभेप्रसंगी केले.

यावेळी कै. बाळासाहेब यांना आदरांजली वाहण्यात आली. समारंभाचे प्रास्ताविक  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका सविस्तर पणे मांडली. त्यांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या कार्याला उजाळा देत सद्यास्थितीत समाजकारण आणि राजकारण ढासळत असून बाळासाहेबांसारख्या स्वच्छ प्रतिमा असलेल्या समर्पित व्यक्तिमत्त्वची गरज असल्याचे नमूद केले. समारंभाचे प्रमुख अतिथी सूर्यकांत कुलकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा संचालक स्वप्नभूमी केरवाडी जि. परभणी यांनी मनोगतामध्ये सांगितले की, लोकसेवक मधुकरराव चौधरी व्यक्ती म्हणून सतत हसतमुख, उत्तम गायक, तत्वज्ञानी, हिंदी भाषाप्रचारक, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ व स्वच्छ चारित्र्याचे नीतीवान आदर्श राजकारणी होते. याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. सिम्बॉइसिस संस्थेची स्थापना, आकाशवाणी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापनेत मोलाची भूमिका अश्या अनेकविविध बाबतीत बाळासाहेबांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. यासोबत लोकमत वृत्तपत्र चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतामध्ये बाळासाहेबांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला. त्यांचे व्यक्तीमत्व ऋषीतूल्य होते, राजकारण देखील बाळासाहेब यांनी पवित्र भावनेने केले. अत्यंत मृदू आणि प्रसंगी कठोर भूमिका अवलंबणारे बाळासाहेब एकमेवा द्वितीय राजकारणी असल्याचे मत मिलिंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

यावेळी शिक्षक तथा प्रसिध्द पत्रकार दिलीप वैद्य, यांच्या “गोष्टीरुप लोकसेवक मधुकरराव चौधरी “या पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाले. बाळासाहेबांच्या संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदर पुस्तकाची निर्मिती केली असल्याचे सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरीष चौधरी, माजी आमदार रमेश चौधरी, अरुणा चौधरी, उपाध्यक्ष डॉ.एस.के.चौधरी, सचिव प्रा.एम.टी.फिरके, प्रा.के.आर.चौधरी, प्रा.पी.एच.राणे, रमेश महाजन, प्रल्हाद बोंडे, तुकाराम बोरोले, प्राध्यापक, मुख्याध्यापक यांची विशेष उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली.  सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभात चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी सन्मानित उपप्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर तसेच कर्मचारी यांनी अधिक परिश्रम घेतले आहे.

Protected Content