मुंबई प्रतिनिधी | राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली आहे. ही भेट राजकारणातील नवीन समीकरणाची नांदी असल्याचा कयास बांधला जात आहे.
राजकारणात कोणीच कोणाचा कायम शत्रू व मित्र नसतो. असं म्हटलं जातं. निवडणुका जवळ आल्या की ‘ऐन केन प्रकारे’ सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने डावपेच आखले जातात. अशातच काही महिन्यांतच होणाऱ्या मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट ही राजकारणातील नवीन समीकरणाची नांदी असल्याचा कयास बांधला जात आहे.
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज झालेली भेट यामुळे आगामी महापालिका निवडणुकेसोबतच विधानसभा निवडणुकांसाठी भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार का? या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला अजून खतपाणी मिळालं आहे. यापूर्वी आशिष शेलार, प्रसाद लाड आणि संजय राऊत यांनीही राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली होती. यामुळे ‘शिवतीर्थ’वर राजकीय घडामोडी घडत असल्याचं चित्र दिसून येत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राजकारणातील नवीन समीकरण निर्माण होऊ शकतं का ? यावर तर्क-वितर्क लढवत जनसामन्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
.