जळगाव प्रतिनिधी । देशी-विदेशी बनावट दारु तयार करण्याआधीच राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट दारु निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला आहे. ही कारवाई चोपडा तालुक्यातील बिडगाव शिवारात करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे. तथापि, घटनास्थळावरुन सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला असून मध्यरात्री साडेबारा वाजता बिडगाव शहरात रवींद्र पुंडलिक पाटील याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये धाड टाकली. तेव्हा जावेद सलीम तडवी (२९, रा. मेहरुण, जळगाव) हा मद्य निर्मिती करण्याच्या तयारीत होता. घटनास्थळावर 350 लिटर स्पिरीट, बाटल्या पॅकिंग करण्याचे मशीन, देशी-विदेशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, इतर साहित्य यासह दोन चार चाकी व एक दुचाकी आढळून आली. पथकाने हे सर्व वाहने व साहित्य जप्त केले. जावेद याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मध्यरात्री साडेबारा ते अडीच या वेळेत ही कारवाई चालली. दरम्यान तडवी हा कधीपासून दारु निर्मिती करीत होता व कोणाला पुरवठा करीत होता याची कसून चौकशी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरु झालेली आहे.
यांना मिळाली होती माहिती
चोपडा तालुक्यात बनावट दारु निर्मितीचा कारखाना उभारला जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांना मिळाली होती. त्यानुसार झावरे यांनी दुय्यम निरीक्षक ए.एस पाटील, जवान के.पी सोनवणे, नितीन पाटील, विजय परदेशी, योगेश राठोड व नंदू नन्नवरे यांचे पथक रवाना केले होते.