भोपाळ (वृत्तसंस्था) लग्न झालेले असतानाही जातीबाहेरील तरुणासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याने महिलेला पतीला खांद्यावर उचलून घेऊन चालण्याची शिक्षा दिल्याची धक्कादायक मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या महिलेचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्याचे सांगत जात पंचायतीने ही शिक्षा सुनावली होती.
येथील थांदला पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका आदिवासी महिलेला आपल्या नवऱ्याला खांद्यावर घेऊन गावभर फिरविण्याची शिक्षा देण्यात आली होती. महिलेचे जातीबाहेरील एका तरुणाशी विवाहबाह्य संबंध होते. यामुळेच शिक्षा म्हणून तिला आपल्या पतीला जबरदस्ती खांद्यावर उचलून घेत चालण्यास भाग पाडण्यात आले. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, गावातील लोकांनी महिलेचा अनादर केल्याचे पोलीस अधीक्षक विनित जैन यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, महिलेच्या सासरच्या मंडळीने आणि गावातील ज्येष्ठ मंडळींनी महिलेला ही शिक्षा सुनावली आहे.