एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ऑईल मील चालकाकडून खंडणीची मागणी करणार्या आठ जणांना अटक करण्यात आली असून यात एका कथित पत्रकाराचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, एरंडोल येथील बालाजी मिलचे संचालक अनिल गणपती काबरा यांना एक पुरुष व एका महिलेने त्यांच्या ऑइल मिल बाबत सरकारी कार्यालयात तक्रार करण्यात येईल असे धमकावून त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आल्याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला भाग पाच सी. सी. टी. एन. एस. गु.र. नंबर १३/ २०२३ भादवि कलम ३८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात खंडणी मागणारे इसम व महिला हे १६ जानेवारी २०२३ रोजी खंडणी मागण्या करता येणार असल्याचे फिर्यादीने पोलिसांना कळविले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहा. पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, पोलीस नाईक मिलिंद कुमावत, संदीप पाटील, जुबेर खाटीक, महिला पोलीस नाईक ममता तडवी, होमगार्ड दिनेश पाटील यांच्या पथकाने सापळा रचला.
दरम्यान, दोन महिला व दोन्ही इसम हे खंडणी मागण्याच्या उद्देश्याने ऑइल मिल मध्ये गेले असता एक महिला व तीन पुरुष ऑईल मिल च्या बाहेर थांबले होते. मिल मध्ये आलेल्या महिलेने अनिल काबरा यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी घेतली असता लागलीच तिला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. छाप्याची चाहूल लागल्याने मिलच्या बाहेर उभ्या असलेल्या एक महिला व तीन पुरुष हे दोन दुचाकींवर म्हसावद नाका मार्गे जळगावकडे पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचा पाठलाग करून पोलीस पथकाने त्यांना जेरबंद केले.
दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी शशिकांत कैलास सोनवणे (वय ३९ धंदा किराणा दुकान प्लॉट नंबर २ द्वारका नगर भुसावळ), सिद्धार्थ सुनील सोनवणे (वय २० धंदा शिक्षण रा. जे. टी. एस. रोड भुसावळ), रूपाली राजू तायडे (रा. कुलकर्णी प्लॉट, धम्मा नगर भुसावळ), मिलिंद प्रकाश बोदडे (वय ३६ धंदा पत्रकार राहणार तळणी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा), गजानन आनंदा बोदडे (वय ३२ धंदा मजुरी रा. कुलकर्णी प्लॉट धम्म नगर भुसावळ), आकाश सुरेश बोदडे (वय २२ वर्ष धंदा चालक राहणार तळणी तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा) यांच्यासह दोन तरूणींना अटक केली.
आकाश बोदडे याने यापूर्वी वेळोवेळी बालाजी ऑइल मिल व कारवाई करण्याबाबत वेगवेगळ्या नावाने सरकारी कार्यालयात अर्ज करून अनिल काबरे यांच्याकडून ६० हजार ते ७० हजार रुपये रोख खंडणी घेतली आहे. तसेच वरील आरोपींसोबत आपसात संगनमत करून अनिल गणपती काबरा यांना बालाजी मिल बाबत तक्रार करण्याची धमकी दाखवून त्यांच्याकडून सात ते आठ लाख रुपये खंडणीची मागणी करून पैकी एक लाख खंडणी स्वीकारली आहे.
या धाडीत एक लाख रुपये रोख आठ मोबाईल दोन दुचाकी एक डिझायर कार असा एकूण दहा लाख चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींपैकी दोन तरूणींच्या वयाबाबत साशंकता असल्याने त्यांना बाल सुधार गृह जळगाव येथे दाखल करण्यात आले असून उर्वरित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहेत. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.