

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्युत सेवा ही केवळ सोय नसून प्रत्येक घराचे आणि उद्योगाचे आधारस्तंभ असल्याने महावितरणच्या कार्यपद्धतीत शिस्त, अचूकता आणि प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा फायदा केवळ उच्च वीज वापर करणाऱ्यांनाच न होता, अल्प वीज वापर करणाऱ्या सामान्य ग्राहकांपर्यंतही पोहोचवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महावितरणचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केले.
विद्युत भवन, अकोला येथे आयोजित विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके, अजय शिंदे, प्रतीक्षा शंभरकर यांच्यासह सर्व विभागीय कार्यकारी अभियंते आणि प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत भागवत यांनी स्पष्ट केले की, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सध्या मुख्यत्वे जास्त वीज वापर करणारे ग्राहकच सहभाग घेत आहेत. मात्र, प्रतिदिन 1 ते 2 किलोवॅट वीज वापरणारे ग्राहकही या योजनेत पात्र असून, त्यांना जास्तीत जास्त अनुदानाचा लाभ होऊ शकतो. त्यामुळे अशा घरगुती ग्राहकांपर्यंत ही योजना पोहोचवून त्यांना आवश्यक माहिती, कर्जाची मदत आणि शासकीय अनुदान याचा लाभ मिळवून द्यावा.
यावेळी त्यांनी आरडीएसएस (Rural Distribution Strengthening Scheme) अंतर्गत सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामांचेही कौतुक केले. या योजनेमुळे गावठाण आणि कृषी फिडर वेगळे होऊन, वीज वितरण अधिक सक्षम होणार आहे. परिणामी, तांत्रिक हानी कमी होईल, वीज पुरवठा अधिक गुणवत्तापूर्ण होईल आणि खंडित वीजपुरवठ्याचा कालावधी लक्षणीयरीत्या घटेल.
भागवत यांनी वीजबिल वसुलीला महत्त्व देत सांगितले की, प्रत्येक महिन्याचे शंभर टक्के वीजबिल वसूल करणे हे महावितरणचे प्रमुख ध्येय असले पाहिजे. ग्राहकांना अचूक बिल देणे, नादुरुस्त मीटर त्वरित बदलणे, शून्य वापर दर्शवणाऱ्या ग्राहकांची तपासणी करणे व आवश्यक त्या सुधारणा करणे, तसेच वीज चोरीसाठी कठोर कारवाई करणे या बाबी अत्यावश्यक आहेत.
नवीन वीज जोडण्यास विलंब न करता कृतिमानकानुसार वेळेत सेवा देण्याचे निर्देश देत भागवत यांनी स्पष्ट इशारा दिला की, विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. वितरण हानी टाळण्यासाठी भरारी पथकाकडून सातत्याने कारवाई केली जावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत प्रशासनाची दिशा ठरवत, नजीकच्या काळात ग्राहक सेवा, बिलिंग प्रणाली आणि वितरण कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा अपेक्षित असल्याचे संकेतही भागवत यांनी दिले.



