जळगाव, प्रतिनिधी | अमृत योजनेचे काम शहरात सुरु असून या कामात सुधारणा करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला करण्यात आली आहे. ठेकेदाराला काम सुरू करण्याचे सांगुनही त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आयुक्त उद्या त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्याला नोटीस बजावून कारवाई करतील, अशी आशा आहे. असे मत आमदार भोळे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
शहरात अमृत योजनेच्या कामामुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेसंदर्भातील तक्रारी नागरिकांनी आयुक्तांकडे लेखी स्वरूपात कराव्या, असे आवाहनही आमदार भोळे यांनी यावेळी केले. दरम्यान, जेडीसीसी बँक कर्ज सेटलमेंटसंदर्भांत जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, आ. राजुमामा भोळे, उपमहापौर आश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, आयुक्त उदय टेकाळे यांची संयुक्त बैठक झाली असून या बैठकीत महापालिकेने जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची एकरकमी परतफेड करण्यावर चर्चा करण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच हुडकोच्या कर्जाबाबत पाठपुरावा करण्यात येत असून यातून लवकरच योग्य मार्ग काढण्यात येईल, अशी माहितीही आ. भोळे यांनी यावेळी दिली.