भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव नजीकच्या वाघूर नदीच्या पात्रात घातक केमिकलचे बॅरल्स उपसून त्याला नष्ट करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे रसायन अतिशय जहरी असून यामुळे साकेगावकरांसह परिसरातील जनता आणि पशुधनाला धोका होण्याची शक्यता असूनदेखील याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत वृत्त असे की, साकेगाव जवळून वाहणार्या वाघूर नदीपात्रात महामार्गाच्या पुलास लागून एक बंधारा आहे. तर याच्या वरील बाजूस म्हणजेच रेल्वे पुलाच्या पलीकडे यापेक्षा मोठा बंधारा बांधण्यात आलेला आहे. हा भाग तसा नेहमी निर्मनुष्य असतो. सकाळी आणि सायंकाळी ये-जा करणारे शेतकरी आणि शेतमजुरांचा अपवाद वगळता येथे सहसा कुणीही जात नाही. याच भागातील नदी पात्रात अत्यंत घातक असे रसायन नष्ट केले जात असल्याची गुप्त माहिती लाईव्ह ट्रेंडस् न्यूजच्या हाती लागली. यानुसार प्रस्तुत प्रतिनिधीने थेट घटनास्थळी धाव घेतली असता एमएच १८-एए- १६९० या क्रमांकाच्या ट्रकमधून रसायनांचे बॅरल उतारून यातील केमिकल हे वाघूर नदीच्या पात्रातील खड्डयांमध्ये टाकण्यात येत असल्याचे दिसून आले.
या रसायनाचा वास हा अतिशय तीव्र असून प्रस्तुत प्रतिनिधीला याचा त्रास जाणवला. यामुळे अगदी राजरोसपणे उघड्यावर हे रसायन टाकल्याने परिसरातील जनतेला याचा त्रास होऊ शकतो. येथून जाणारे पाणी हे पुढील बंधार्यात अडविण्यात आलेले आहे. सध्या हा बंधारा ओव्हरफ्लो झाला असून हे पाणी थेट पुढे तापी नदीच्या पात्रात जाऊन मिळते. अर्थात, या रसायनामुळे परिसरातील तिघ्रे व साकेगाव येथील ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तसेच यामुळे बंधार्यातील माशांसह अन्य जीवसृष्टीला विषबाधा होण्याची शक्यता आहे. हा ट्रक कुणाचा आणि हे रसायन कुठून आणले ? अशी माहिती यासोबत असणार्यांना विचारली असता त्यांनी याबाबत कैलासभाऊचे नाव घेतले. मात्र कैलासभाऊ या व्यक्तीबाबत माहिती देण्यास त्यांनी साफ नकार दिला.
कोणत्याही कंपनीत तयार होणारे वा निकामी असणारे रसायन नष्ट करण्यासाठी शासकीय परवानगी आवश्यक असते. यासाठी संबंधीत कंपनीला एमआयडीसीकडे माहिती द्यावी लागते. या प्रकारचे रसायन हे खुल्यावर नष्ट करू नये असा नियम आहे. तथापि, यातील एकाही नियमाचे पालन न करता थेट नदीपात्रात रसायन ओतण्याचा हा प्रकार अतिशय गंभीर असून याकडे सर्व शासकीय विभागांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. उघड्यावर असणारे हे रसायन मनुष्य तसेच प्राण्यांच्या आरोग्याला अपायकारक असतांनाही हा प्रकार घडत असतो. काही दिवसांपूर्वी वाघूर नदीपात्रात रेल्वे पुलाखाली हे रसायन फेकण्यात आले होते. यानंतर याच्या वरील भागात हा प्रकार घडला आहे. अर्थात, संबंधीतांनी आता वाघूरला रसायन नष्ट करण्याचे ठिकाण बनविल्याचा धक्कादायक प्रकार यातून उघड झाला आहे. याची दखल घेऊन संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
पहा : वाघूर नदीपात्रात घातक रसायनाला नष्ट करतांनाचा व्हिडीओ.