अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील चौबारी गावात राहणारी २४ वर्षीय परप्रांतीय तरूणी ही सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतांना बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता गावातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रिनाबाई बिरबल पाडवी वय २४ रा. पानसेमल ता.बडवानी मध्यप्रदेश ह.मु.चौबारी ता.अमळनेर असे मयत झालेल्या परप्रांतीय तरूणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील पानसेमल येथील रहिवाशी असलेली रिनाबाई पाडवी ही तरूणी अमळनेर तालुक्यातील चौबारी गावात आपल्या परिवारासह वास्तव्याला होती. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिनाबाई पडवी हीने घरात कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला परंतू तिच्या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याने मारवड पोलीसात बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानुसार बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
दरम्यान, तिचा शोध सुरू असतांना बुधवारी १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता गावातील राहत असलेल्या परिसरातील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तिच्या नातेवाईकांसह मारवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला होता. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहे.