जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील दिनकर नगरातील ६ दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह असोदा रोडजवळील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जयेश प्रकाश विसपुते (वय-४२, रा. दिनकर नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जयेश विसपूते हे प्रौढ व्यक्ती जळगाव शहरातील दिनकर नगरात आईवडील, २ विवाहित बहिणी यांच्यासह वास्तव्याला होता. शनिवारी १० फेब्रुवारी रोजी जयेश विसपुते हे घरात कुणाला काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाले होते. त्याप्रकरणी सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा शोध जारी होता. शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी २ वाजता असोदा रोडवरील एका विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून ओळख पटवून जयेश विसपूते यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीसांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.