मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाची आपत्ती कमी होत असल्याने मास्क वगळता राज्यातील कोविडचे सर्व नियम उठविण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. याबाबत टास्क फोर्सशी चर्चा करून निर्णय जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या कोविडची रूग्णसंख्या कमी झालेली असून दोन वर्षानंतर लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने कोविडचे निर्बर्ंध उठविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. या अनुषंगाने आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
याबाबत राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाची रूग्णसंख्या कमी झाली असली तरी लसीकरणाला हवा तितका वेग आलेला नाही. यामुळे आगामी काळात लसीकरणाला गती देण्याचे उद्दीष्ट्य ठेवण्यात आलेले आहे. कोविडची रूग्णसंख्या कमी झाल्यामुळे रेल्वे प्रवासासह अन्य काही बाबींचा अपवाद वगळता आधीच निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तर प्रवासाबाबतही लवकरच निर्णय होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही घरीच साजरी करण्यात आली आहे. पण, यंदा आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर गुढीपाडव्याला शोभायात्रा काढण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
दरम्यान, कोविडचे सर्व नियम उठविण्यात येणार असले तरी तूर्तास मास्कची सक्ती कायम राहणार असल्याचे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, कोविडच्या नियमांपासून मुक्तता मिळण्याआधी टास्क फोर्ससोबत चर्चा करण्यात येईल. नंतर याबाबतची अधिकृत घोषणा होईल. तथापि, मास्कची सक्ती कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेतत्यांनी दिले आहेत.