जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ Dilip Wagh यांनी आज अजितदादा पवार यांच्या गटासोबत जाण्याची भूमिका घेतली असून पक्षाच्या जिल्हा बैठकीत ते दिसून आल्याने या मतदारसंघातील समीकरणे पुन्हा एकदा बदलणार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर याचे पडसाद जिल्ह्यात उमटणार असल्याचेही स्पष्ट संकेत मिळाले होते. अनिल भाईदास पाटील यांनी तर मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यातच त्यांच्या सोबतीला जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्रनाना पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, विनोद देशमुख आदींनी तात्काळ पाठींबा दिला. यानंतर यथावकाश माजी आमदार मनीष जैन, माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदींसह अन्य पदाधिकारी देखील अजितदादा पवार यांच्या गटात आले. आज सावदा येथील संपूर्ण कार्यकारिणी हीच अजितदादा पवार यांच्या गटात विलीन झाली.
हे देखील वाचा : दिलीप वाघ यांनी भाजपच्या ऑफरचा केला गौप्यस्फोट
दरम्यान, आज सायंकाळी ना. अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यात पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे देखील बैठकीला उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यांनी आजवर आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. पहिल्या टप्प्यात ते शरद पवार यांच्या गटासोबत दिसून आले असले तरी आज त्यांनी अजितदादा पवार यांच्या गटाला पाठींबा दिल्याचे दिसून आले.
दिलीप वाघ यांनी अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. मध्यंतरी महाविकास आघाडीच्या कालखंडात आमदार किशोरआप्पा पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्यात बर्यापैकी सुसंवाद निर्माण झाल्याचे चित्र होते. यानंतर एक वर्षे दोन्ही नेते विरोधात होते. आता आजी-माजी आमदार पुन्हा एकदा एकाच आघाडीत सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. तर या दोन प्रबळ नेत्यांना प्रखर विरोध करत राजकीय वाटचाल करण्याचे आव्हान भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि शिवसेना-उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासमोर असणार आहे.