अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देशची मुलुखमैदान तोफ म्हणून ख्यात असणारे माजी आमदार तथा समाजवादी चळवळीतील अध्वर्य साथी गुलाबराव वामनराव पाटील यांचे आज वृध्दापकाळाने निधन झाले असून त्यांच्या रूपाने खान्देशातील एक तळपता तारा काळाच्या पडद्याआड गेला आहे.
मायबोली अहिराणीतूनच शपथ घेईल म्हणत संपूर्ण विधानसभा गाजवून सोडत विरोधक म्हणून सत्ताधार्यांना सळो की पळो करून सोडणार्या तत्कालीन मुलुख मैदान तोफ माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय ९०) यांचे २२ रोजी सायंकाळी साडे सात वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा २३ रोजी दुपारी २ वाजता दहिवद ता अमळनेर येथून निघणार आहे.
गुलाबराव वामनराव पाटील हे तीन वेळा एकूण १३ वर्षे जनता दलाचे आमदार होते. शेतकर्यांसाठी शिंगाडे मोर्चा, सभागृहातून राजदंड पळवणे आदी भूमिका लक्षवेधी ठरल्या होत्या. अतिशय फर्डे वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे. ते गुणवन्त पाटील यांचे वडील तर अमळनेर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील यांचे आजोबा होत.
साथी गुलाबराव पाटील हे खान्देशच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासातील एक महत्वाचा अध्याय होते. त्यांच्या निधनाने हा अध्याय आता लोप पावला आहे. आपल्या परखड आणि पुरोगामी भूमिकेसाठी ते ख्यात होते. याच भूमिकेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या रूपाने एक सच्चा नेता आणि चळवळीतील एक अतिशय प्रामाणिक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. लाईव्ह ट्रेंडस न्यूज परिवारातर्फे त्यांना आदरांजली.