ठाणेचे माजी महापौर नईम खान यांचा अजित पवार गटात प्रवेश

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कळवा-मुंब्रा परिसरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात काही दिवसांपुर्वीच जाहीर प्रवेश केला असतानाच, त्यापाठोपाठ काँग्रेसचे नेते, ठाणे महापालिकेचे माजी महापौर नईम खान यांनी बुधवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यानिमित्ताने आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाने पक्ष प्रवेशांची मालिका सुरु केल्याचे चित्र आहे.

मुंब्रा भागातील काँग्रेसचे नेते नईम खान यांनी १९९२ मध्ये ठाण्याचे महापौर पद भुषविले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु २०२० मध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे ठाणे काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी खान यांना गळा लावत त्यांचा पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी हा पक्षप्रवेश झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खान यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली. असे असले तरी नईम खान यांचा मुलगा मिराज खान हा राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक असून तो शरद पवार गटासोबत असल्याचे चित्र आहे.

Protected Content