मुंबई वृत्तसंस्था । श्रीमंत लोक कोरोना लक्षणं नसतानाही आयसीयू बेड्स अडवून ठेवत आहेत, अशी धक्कादायक माहिती देतानाच हा प्रकार थांबवावा लागेल. ज्यांना करोनाची लक्षणं आहेत, त्यांना बेड्स दिली पाहिजेत, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही धक्कादायक माहिती दिली. त्यांनी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे रायकर यांचा मृत्यू होणं हे दुर्देवी आहे. पुण्यात बेड्सची आणि रुग्णवाहिकांची कमतरता दुर्देवी असून जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना रुग्णवाहिका किती घ्याव्यात आणि किती घेऊ नये याबाबत कोणतंही बंधन घातलेलं नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत लागेल तेवढ्या रुग्णवाहिका घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त रुग्णवाहिका घेतल्या तरी काही हरकत नाही. मात्र रुग्णांना मोफत रुग्णवाहिका मिळाली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
ग्रामीण भागात ८० टक्के नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत. त्यांच्यावर परिस्थितीनुसार उपचार होत आहेत. मात्र, अनेक लोक लक्षणं नसतानाही बेड्स अडवून ठेवत आहेत, असंही ते म्हणाले.