फैजपूर, ता. यावल-निलेश पाटील | येथील स्मशानभूमीत वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेकदा मोबाईलच्या उजेडातच अंत्यसंस्कार करावे लागत असून यामुळे शहरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
फैजपूर म्हटले की, डोळ्यासमोर येते ते ऐतिहासिक शहर ! पण याच ऐतिहासिक शहराची सध्या दैनावस्था झाली आहे. प्रशासकांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका नागरिकांना बसत आहे. स्मशानभूमीतील मनुष्याची शेवटची वाट ही अंधारातच जात आहे. मोबाईलच्या बॅटरीवर मृतदेहाला अग्नीडाग दिला जातो ही शहरासाठी शोकांतिका बाब म्हणावी लागेल.
फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठ मधील स्मशानभूमीत सर्व लाईट बंद आहे. पालिका प्रशासनाच्या कार्यपध्दती वर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या शहरातील सोशल मीडियावर दक्षिण बाहेर पेठ भागातील स्मशानभूमीतील मोबाईलच्या बॅटरी च्या साहाय्याने मृतदेहावर अग्निडाग दिला जात असल्याचे फोटो व्हायरल झाले आहे. यात पूर्ण पणे स्पष्ट स्मशानभूमीतील संपूर्ण लाईट बंद असल्याचे चित्र दिसत आहे.मोबाईलचे टॉर्च लावून अग्निडाग दिला जात आहे. यात पालिकेचे पूर्ण ढिसाळ नियोजनाचा बट्टापोळ झाला आहे. पालिकेने तात्काळ स्मशानभूमीतील लाईट दुरुस्त करून मनुष्याची शेवटची वाट सुखकर करावी हीच शहरवासीयांची मागणी आहे.
तर, फैजपुरातील अन्य सर्व असुविधांचे तात्काळ निराकरण करून शहरवासियांना दिलासा द्यावा, किमान फैजपुरकरांची शेवटची यात्रा तरी सुखकर करावी अशी अपेक्षा फैजपुर शहरातून व्यक्त होत आहे.