
पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्ष पूर्ण झाली असली तरी अजूनही काही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पारोळा तालुक्यातील महाराणा प्रताप नगर, वंजारी खुर्द हे त्याचे ठळक उदाहरण ठरत आहे. या गावाला अद्यापही स्मशानभूमी मिळालेली नसल्यामुळे ग्रामस्थांनी पारोळा पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू केले असून, प्रशासनाने त्वरीत निर्णय न घेतल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

वंजारी खुर्द येथील ग्रामस्थांनी यापूर्वी १३ मार्च २०२५ रोजी प्रशासनाकडे निवेदन दिले होते. त्या निवेदनात त्यांनी स्पष्ट केले होते की, १ मे २०२५ रोजी रास्ता रोको आणि आत्मदहन करू. या निवेदनाची दखल घेत जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी लेखी आश्वासन दिले होते की, ३० दिवसांत स्मशानभूमीचा प्रश्न सोडवण्यात येईल. मात्र आश्वासनाला आता १५० दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.
या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी २४ सप्टेंबरपर्यंत तोडगा न निघाल्यास २५ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन करणार असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. राजपूत करणी सेनेचे कोअर कमिटी अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, आणि पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर करून आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
सध्याच्या स्थितीत कोणताही प्रशासनिक अधिकारी वा लोकप्रतिनिधी ग्रामस्थांच्या भेटीस आलेला नाही. परिणामी ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आहे. आज रोजी ग्रामस्थ पारोळा पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले आहेत आणि जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाची उदासीनता आणि आश्वासनांचा पोकळपणा यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामस्थांचा प्रश्न केवळ स्मशानभूमीपुरता मर्यादित नसून, तो ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने एक गंभीर संकेत आहे.



