पुणे – पुढील काळात जर विधानसभा निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्षांची महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली तर भाजपचे ५० आमदार सुद्धा निवडून येणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाटील म्हणाले, भाजपाला अलीकडेच हैदराबाद आणि राजस्थान येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. त्यानंतर आता भाजपकडून मिशन मुंबईचा नारा दिला गेला आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, राजस्थान आणि हैदराबाद येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे काय होते. काँग्रेसमधील स्थानिक पातळीवरील अंतर्गत धुसफूस होती का, हे मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असेही पुढे ते म्हणाले.
राज्यात काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदार संघांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची ताकद स्पष्टपणे समोर आली आहे, असेही ते म्हणाले.