युरोपीय महासंघाने काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला झापले

023ae1b9c29845c3b5b4da7fc8f92008 18

स्ट्रासबर्ग (फ्रान्स), वृत्तसंस्था | भारतात दहशतवादी हे चंद्रावरून येत नाहीत. ते शेजारी (पाकिस्तान) देशातून येतात. अशा वेळी आपण भारताला पाठिंबा दिला पाहिजे,’ असे मत पोलंडचे नेते आणि युरोपीय महासंघाचे सदस्य रिजार्ड जार्नेकी यांनी व्यक्त केले आहे. काश्मीरसंदर्भात अपप्रचार करून आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानला युरोपीय महासंघाने खडेबोल सुनावले. युरोपीय महासंघातील अनेक सदस्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांना संरक्षण दिले जात असून, ते शेजारी देशांत हल्ले घडवून आणतात, असे सांगतानाच त्यांनी भारताला पाठिंबाही दिला.

 

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित करून सहानुभूती मिळवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र, प्रत्येक ठिकाणी पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली. काश्मीरच्या मुद्द्यावर युरोपीय संघातही तब्बल ११ वर्षांनंतर चर्चा झाली. त्यात अनेक सदस्यांनी भारताला पाठिंबा दिला. यावेळी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर टीका केली. ‘भारतीय लोकशाही महान आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांची आपण दखल घेतली पाहिजे. दहशतवादी पाकिस्तानात कट रचतात आणि युरोपमध्ये हल्ले घडवून आणतात,’ असा थेट आरोप इटलीचे नेते आणि महासंघाचे सदस्य फुलवियो मार्तुसिलो यांनी केला. काश्मीर मुद्द्यावर भारत-पाकिस्तानने चर्चा करायला हवी आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Protected Content