जळगाव/पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना ज्या रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्या संदर्भात इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. खेवलकर यांचा रेव्ह पार्टीशी कोणताही संबंध नसून, त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवण्यात आले असल्याचा भंगाळे यांनी म्हटले आहे.
भंगाळे यांच्या मते, “प्रांजल खेवलकर यांना ट्रॅप केले गेले आहे. त्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि फसले गेलेले आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कोणत्याही लोकांशी त्यांचा संबंध किंवा संपर्क नव्हता.” मनीष भंगाळे यांनी खेवलकर यांच्या निर्दोषत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

या संदर्भात महत्त्वपूर्ण तांत्रिक माहिती आपल्याकडे असल्याचा दावाही भंगाळे यांनी केला आहे. ते म्हणाले की, “याबाबत दोन दिवसांत तांत्रिक गोष्टी मी पोलिसांसमोर सांगणार आहे. पोलिसांनी जरी या प्रकरणात कॉल रेकॉर्डिंग तपासणी केली, तरी प्रांजल खेवलकर यांचा या पाठीशी संबंध नव्हता हे समोर येईल.”
एकेकाळी एकनाथ खडसे यांच्याविरोधात गंभीर आरोप करणाऱ्या मनीष भंगाळे यांनी आता खडसेंच्या जावयांच्या बाजूने केलेल्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांच्या पुढील तपासात आणि भंगाळे यांच्या दाव्यांमधून या प्रकरणाचे सत्य कसे समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



