Home Cities जळगाव छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा उभारा; रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशनची मागणी

छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा उभारा; रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशनची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशन आणि मेहरूण परिसरातील सजग नागरिकांनी स्वामी समर्थ चौकात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी केली आहे. या संदर्भात रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशनच्या वतीने महापौर दिपमाला काळे यांना सोमवार, ६ एप्रिल रोजी निवेदन सादर करण्यात आले असून, आगामी महासभेत या विषयावर ठराव मंजूर करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.

मेहरूण परिसरातील अशोक किराणा ते जकात सोसायटी आणि श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी या मुख्य रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या स्वामी समर्थ चौकात हा पुतळा उभारण्याचा मानस नागरिकांनी व्यक्त केला आहे. या परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत असून, रयतेचे राजे छत्रपती संभाजी महाराज यांचे आदर्श विचार, त्यांचे धाडस आणि महिलांविषयी असलेली त्यांची उच्च विचारसरणी भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

प्रस्तावित पुतळा उभारल्यामुळे परिसरातील रहदारीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची ग्वाही नागरिकांनी दिली असून उलट यामुळे ‘सुंदर जळगाव’ या संकल्पनेला अधिक बळकटी मिळेल, असे फाउंडेशनचे म्हणणे आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महासभेने तातडीने जागा मंजूर करावी आणि पुतळा उभारणीसाठी पालिकेच्या फंडातून निधीची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील अबालवृद्धांनी केली आहे. या निवेदनावर रामेश्वर कॉलनीतील असंख्य रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या असून, आता महापालिका प्रशासन या जनभावनेची दखल कधी घेते, याकडे संपूर्ण मेहरूण परिसराचे लक्ष लागले आहे. या निवेदनावर नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, दिपक मांडाळे, संजय सपकाळे, ज्ञानेश्वर पाटील, नंदु पुराणिक, संदिप मांडोळे, संजय जगताप, विशाल पाटील, सचिन वाघ, ॲड. ललित तेली, उमेश खोंबटे, चेतन शिंपी, यशवंत सपकाळे, सागर इंगळे  आदींची स्वाक्षरी आहे.


Protected Content

Play sound