एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल नगरपालिकेमार्फत ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पीता पिंपळे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा आज निषेध करण्यात आला आहे.
दि.३० ऑगस्ट २०२१ रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे, माजीवाडा प्रभाग या सायंकाळी ५.३० च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडी फेरीवाले अमरजीत यादव यांनी त्यांच्यावर व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेना हल्ला करून या दोघांनाही गंभीर दुखापत केली आहे. या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पुर्णपणे तुटून रस्त्यावर पडली व उजव्या हाताला अंगठ्यासह गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर खोल मार लागला आहे.अंगरक्षक सोमनाथ पालवे याच्या डाव्या हाताचे एक बोट पुर्णपणे तुटून पडले. झालेला प्रकार अतिशय गंभीर असून निंदनीय आहे.
एका महिला अधिका-यावर अशा प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच अत्यंत चिंताजनक बाब असून या बाबीचा सर्व स्तरावरून निषेध होणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही 1) महाराष्ट्र राज्य नगरपरीषद संवर्ग अधिकारी संघटना शाखा एरंडोल तसेच भारतीय मजदूर संघ शाखा एरंडोल संघटनेच्या वतीने या गुन्हेगारी कृत्याचा जाहीर निषेध करत आहोत.निषेध नोंदविणेसाठी युनियन मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव, उपविभागीय अधिकारी एरंडोल ,तहसीलदार एरंडोल तसेच पोलिस निरीक्षक यांना काम बंद आंदोलनाचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी उपस्थित मुख्याधिकारी विकास नवाळे, हितेश जोगी कार्यालय अधीक्षक, युनियन चे अध्यक्ष सुरेश दाभाडे, विकास पंचबुधे, सचिव दिपक गोसावी तसेच इतर अधिकारी विनोदकुमार पाटील, डॉ.योगेश सुकटे ,डॉ.अजित भट, शरद राजपूत ,विक्रम घुगे, अशोक मोरे, किशोर महाजन, प्रकाश सूर्यवंशी, एस. आर. ठाकुर, आर टी महाजन, वैभव पाटील, आनंद झांबरे, कैलास देशमुख, तुषार शिंपी, आशिष परदेशी, लक्ष्मण पाटील, भूषण महाजन उपस्थित होते.
प्रस्तूत प्रकरणी अटक केलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, ही मागणी करण्यात आली.