एरंडोल प्रतिनिधी | अंशतः २०% अनुदानित वरील शालार्थ आयडीचे त्रुटी पूर्तता प्रस्ताव जिल्हा स्तरावरील शिबिरातून मार्गी लावू असे आश्वासन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्या पदाधिकार्यांच्या भेटी दरम्यान दिले.
याबाबत वृत्त असे की, आ. डॉ. सुधीर तांबे हे भुसावळ येथील रोटरी क्लब ऑफ भुसावळ व ताप्ती व्हॅली येथील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्या पदाधिकार्यानंी त्यांनी भेट घेऊन आपल्या समस्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रदीर्घ असा संघर्ष केल्यानंतर राज्यातील उच्च माध्यमिक शिक्षकांना २० टक्के वेतन सुरू झाले व या शिक्षकांचे पुढील नियमित वेतन व्हावे याकरीता शालार्थ आयडी देणे आवश्यक बाब आहे म्हणून शिक्षण संचालक पुणे, शिक्षण आयुक्त पुणे, यांच्या वतीने २० टक्के अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करणार्या शिक्षकांचे शालार्थ आयडी देण्यासंदर्भात राज्यभर संदर्भीय प्रस्ताव तपासून हे प्रस्ताव योग्य असल्याची खात्री झाल्यानंतर शालार्थ आयडी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नेहमीच कार्यालयीन कामकाजामध्ये अग्रेसर असलेला जळगाव जिल्हा लातूर नंतर महाराष्ट्र मध्ये दुसर्या टप्प्यावर शालार्थ प्रस्ताव कामकाजात होता. शिक्षकांना अपेक्षा होती की,आपल्याला लवकरच शालार्थ आयडी मिळणार मात्र ही अशा फोल ठरली. त्यामुळे संघटनेने माननीय आमदार सुधीर तांबे व राज्यातील शिक्षक-पदवीधर आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून शालार्थ आयडी ला उशीर होत असल्यामुळे मार्च,एप्रिल,मे,जून या चार महिन्यांचे ऑफलाईन वेतनाची मागणी शासनाकडे केली व विनाअनुदानित शिक्षकांची चूल पेटत ठेवली. दुसरीकडे शालार्थ आयडी प्रस्तावांची तपासणी करत असताना बहुतांशी शाळांच्या छोट्या-मोठ्या त्रुटी वळविण्यात आल्या असल्याचे म्हटले असुन अनेक त्रुटी छोट्या – छोट्या आहेत की ,त्या लगेच निकाली निघू शकतात आणि त्या पद्धतीने आमदार तांबे व उपसंचालक नितीन उपासनी हे देखील सहकार्य या ठिकाणी आपल्या स्तरावरून करीत असल्याचे म्हटले आहे. त्याचाच भाग म्हणून धुळे, नंदुरबार व नाशिक तीन जिल्ह्यांचे शालार्थ त्रुटी पूर्तता प्रस्ताव सादर करण्याकरता उपसंचालक उपासनी यांनी शिबिराचे आयोजन करून आपल्या अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय दिला.
मात्र तारीख २४/८/२०२१ रोजी जळगाव जिल्ह्याचे त्रुटी पूर्तता शिबिर घेतले जाणार होते परंतु उपसंचालक कार्यालय नाशिक यांच्याकडून आलेल्या व्हाट्सअप संदेशामध्ये अनुसूचित जाती जमाती संदर्भात शासनस्तरावरून एक(समिती)कमिटी आलेली असल्याने जिल्ह्यातील त्रुटी पूर्तता कामकाज पुढे कळविला जाईल असे कळविण्यात आले परंतु आज रोजी दोन आठवड्याचा कालावधी लोटला गेला.त्यामुळे जिल्ह्यातील संस्थाचालक मुख्याध्यापक व या त्रुटीतील शिक्षक चिंतेमध्ये होते.सातत्याने संघटनेकडे विचारणा होत होती. म्हणून संघटनेच्यावतीने आमदार सुधीर तांबे यांची भेट आज भुसावळ या ठिकाणी घेण्यात आली व शिक्षकांच्या त्रुटी पूर्तता शिबिर कॅम्पचे आयोजन जिल्हा मध्येच लवकरात लवकर करण्यात यावे याबाबत विनंती केली.
दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तात्काळ नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याशी फोनवर बोलून २० टक्के अंशतः अनुदानित तत्त्वावरील शिक्षकांचा त्रुटी पूर्तता कॅम्प चे आयोजन लवकर करा असे विनंती केली. त्यांनी तुटपुंज्या वेतनावर काम करणार्या शिक्षकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून शिक्षक हीताने सकारात्मक निर्णय तात्काळ कळवून येणार्या बुधवारपासून त्रुटी पूर्ततेचा प्रस्ताव जळगाव येथेच स्वीकारले जातील असा शब्द दिला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांचा मानसिक ताण कमी होणार आहे कारण अशी चर्चा होती की आपल्या शिक्षकांना त्रुटी पूर्तता शिबिर जिल्ह्यांमध्ये झाले नाही तर पुणे येथे प्रस्ताव जमा करावे लागतील.ही बाब आर्थिक दृष्ट्या खूप खर्चिक होती.कारण प्राप्त परिस्थितीमध्ये पुणे कडे जाणार्या रेल्वे गाड्या पुरेशा नाही आहेत, खाजगी वाहनाने चार महिन्यापासून पगार नसलेल्या शिक्षकाने पुण्याचा प्रवास हा खूप महागडा व खर्चिक आहे. याला कमीत कमी खाजगी गाडी पुणे जाण्यासाठी केले असता माझ्या बांधवाला दहा हजारापेक्षा जास्त प्रवास खर्च लागला असता व पुन्हा एखाद्या कमी-जास्त कागदपत्र घरी राहिल्यास पदरी निराशा घेऊन परत माघारी यावे लागले असते.
या पार्श्वभूमिवर शिक्षकांचा कँप हा बुधवारी जळगाव येथच होणार आहे असे उपासनी यांनी कळविले आहे. यानंतर पुणे येथील जे योग्य प्रस्ताव शालार्थ आयडी साठी असतील त्या शाळांना व शिक्षकांना आपला शालार्थ आयडी लवकर देण्यात यावा, अघोषित शाळांची माहिती शासन स्तरावर लवकर जावी व मुंबई स्तरावरील त्रुटी पूर्तता मध्ये अडकलेल्या शाळांना तात्काळ निधीची व्यवस्था करून त्यांनादेखील अनुदान घोषित करा या सर्व बाबींचा पाठपुरावा आमदार सुधीर तांबे व कृती संघटना यांच्या वतीने पुढील आठवड्यामध्ये कळविण्यात येणार असल्याचे प्रा.अनिल परदेशी(राज्यसचिव),प्रा.दीपक कुलकर्णी(राज्यध्यक्ष),प्रा संतोष वाघ,प्रा राहुल कांबळे,प्रा पराग पाटील,प्रा.कर्तारसिह ठाकूर यांनी सांगितले आहे. आजच्या पाठपुराव्यासाठी कॉंग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष श्री शैलेश राणे यांचे विशेष सहकार्य संघटनेला लाभले पाठपुरावा यादरम्यान महाराष्ट्र राज्य उमा कमवि शाळा कृती संघटना जळगाव चे सदस्य व सर्व लाभार्थी शिक्षक सोबत होते. यामध्ये विजय ठोसर, बडगुजर सर,निवृत्ती पाटील,सुधीर शिरसाठ, पराग महाजन,भूषण सर, संदीप राजपूत सर उर्दू माध्यमाचे सर्व बांधव,चोपडा येथील बांधव,बोदवड येथील महिला शिक्षिका,पाचोरा येथील देसले सर यांचा समावेश होता.