एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चिमणराव पाटील यांच्यावर अतिशय आक्षेपार्ह शब्दांमध्ये टिका केल्यावरून येथे शरद कोळी Sharad Koli यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या महाप्रबोधन यात्रेत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी Sharad Koli यांनी केलेली वक्तव्ये ही वादाच्या मोठ्या भोवर्यात सापडली असून याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. यात धरणगाव येथे शरद कोळी यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि गुजर समाजाच्या विरोधात खालच्या स्तरावरून टीका करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शरद कोळी यांच्या भाषणावर बंदी घालण्यात आली. तर, नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याआधीच ते जिल्ह्यातून बाहेर गेले.
दरम्यान, शरद कोळी यांनी आधी एरंडोल येथील सभेत आमदार चिमणराव पाटील यांच्या विरूध्द देखील खालच्या भाषेत टीका केली होती. यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भीमसिंग जाधव, राजेंद्र चौधरी आणि शालीग्राम गायकवाड यांनी एरंडोल पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार शरद कोळी यांच्या विरूध्द भादंवि कलम-५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात, शरद कोळी यांच्यावर जळगाव जिल्ह्यात हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.