कापड दुकानाला भिषण आग !

पाचोरा शहरातील घटना; ६० लाखांचे मोठे नुकसान

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बस स्टॅण्ड रोडवरील मुद्रा एन. एक्स या रेडिमेड कापड दुकानास आज ६ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. लागलेल्या आगीत दुकानातील फर्निचर सह सुमारे ६० लाख रुपयांचे कापड जळुन खाक झाली आहे.

नगरपालिकेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी दाखल होण्यास एक तास विलंब झाल्याने पुर्ण दुकान जळुन खाक झाले असुन आग आटोक्यात आणण्यासाठी उपस्थितांनी मिळेल तेथुन पाणी आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला. अखेर भडगाव नगर परिषदेचे अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले होते.

यासंदर्भात असे की, शहरातील बस स्टॅण्ड रोडवर गणेश प्लाझा शाॅपिंग सेंटर आहे. या शाॅपिंग सेंटर मधील दुकान क्रं. ५ हे मुद्रा एन. एक्स. या नावाने नावाजलेले कापड दुकान असुन दुकान चालक राहुल मोरे रा. शिवाजी नगर, पाचोरा यांनी दिवाळी निमित्त दुकानात नव नविन ब्रॅण्ड ची विविध रेडिमेड कापड भरुन ठेवली होती. दरम्यान दि. ५ नोव्हेंबर रोजी राहुल मोरे यांना खाजगी काम असल्याने दुकानातील कामगारांनी रात्रीच्या सुमारास दुकान वाढवुन आप आपल्या घरी निघुन गेले होते. दि. ६ नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास अचानक दुकानस आग लागल्याचे तेथुन जाणाऱ्या एका रुग्णवाहिका चालकास निदर्शनास येताच रुग्णवाहीका चालकाने तात्काळ राहुल मोरे यांना भ्रमणध्वनी द्वारे कल्पना दिली असता राहुल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास आग लागल्याचे सांगितले. मात्र अग्निशमन दलास घटनास्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानास वेढा घातला. उपस्थितांनी मिळेल तेथुन पाणी आणत आग विझविण्याचा प्रयत्न केला. याचवेळी भडगाव नगरपालिकेचे व त्यानंतर पाचोरा अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र तो पर्यंत संपूर्ण दुकानातील फर्निचर सह कापड हे जळुन खाक झाले होते. या आगीत होतकरू राहुल मोरे यांचे सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग नेमकी कशामुळे लागली असावी याचे कारण अद्याप समजू शकले नसुन शाॅर्ट सर्किटमुळेच आग लागली असावी असा अंदाज बांधण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content