बसने दुचाकीला चिरडले : सुदैवाने कुटुंब बचावले !

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील बस स्थानकाजवळ एका दुचाकीला बसने अक्षरश: चिरडले असून दैव बलवत्तर असल्याने यावरील कुटुंब बचावले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, एरंडोल मार्गे साक्री येथून आसोदा-भादली येथे शेंडीच्या कार्यक्रमासाठी जाणाऱी दुचाकी एरंडोल बस स्थानकाकडे वळणारी शिवशाहीबस यांच्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अपघात होऊन दुचाकी वरील चार जण खाली कोसळले. या अपघातातच दुचाकीचा अक्षरश: चुराडा झाला असला तरी यावरील चौघे जण बचावले आहेत. यात सहा वर्षीय बालिका जखमी झाली.

राकेश हरी बच्छाव (वय ३६वर्ष ) हे त्यांची पत्नी योगिता बच्छाव तसेच मुलगा कार्तिक (वय सहा ) आणि मुलगी भाग्यश्री वय नऊ वर्ष असे चारही जण दुचाकीने साक्री येथून निघून असोदा भादली येथे शेंड्यांच्या कार्यक्रमाला जात होते. तर धुळे बस आगाराची शिवशाही बस ही धुळ्याकडून येऊन एरंडोल बस स्थानकाकडे वळतांना दुचाकी व शिवशाही बसचा शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अपघात झाला. यात भाग्यश्री जखमी झाली असून ती एरंडोल येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

बस स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून या भागात बेशिस्त रहदारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बेशिस्त रहदारीमुळे हा अपघात झाला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, नशिब बलवत्तर असल्याने हे कुटुंब यातून बचावल्याचेही स्पष्ट झाले आहे. बस स्थानक प्रवेशद्वारासमोर भराव पुलाचे काम सुरू असून या परिसरात दिशादर्शक फलक न लावल्यामुळे बेशिस्त रहदारी बोकाळली आहे. यामुळे येथे दिशादर्शक फलक लावण्याची मागणी होत आहे.

Protected Content