एरंडोल प्रतिनिधी । तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई असल्याबाबत तहसिलदार अर्चना खेतमाळीस यांना निवेदन देऊन याबाबत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात चांगला पाऊस होत असल्याने पिकांना खतांची नितांत आवश्यकता असुन व्यापार्यांकडे खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. प्रशासनाने सदर साखळी शोधुन काढावी. शेतकर्यांना रांगा लावून देखील खत मिळत नाही व हेच खत काळया बाजारात विक्री केली जात असल्याचे म्हटले आहे.अशा लोकांवर योग्य ती कारवाई करावी व शेतकर्यांना पाच वर्षा नंतर पुन्हा कृत्रिम खत टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. तसेच आघाडी सरकारवर आरोप करीत कृत्रिम खत टंचाई आघाडी शासनाचा पायगुण असल्याचे देखील म्हटले असुन कृषी विभाग साठेबाजारावर मेहेरबान असल्याचे म्हटले आहे.तालुक्यात योग्य नियोजन कृषी विभागाने न केल्यामुळे खतांची ज्यादा दराने विक्री होत असुन शेतकर्याची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत असुन याबाबत अशा खते विक्रेत्यांवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनावर नगराध्यक्ष रमेश परदेशी, तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील,तालुका सरचिटणीस अमोल जाधव, माजी तालकाध्यक्ष सुभाष पाटील,माजी संजय गांधी निराधार योजना सभापती सुनिल पाटील,संजय साळी, तालुका उपाध्यक्ष वाल्मिक सोनवणे आदींच्या सह्या आहेत.