एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतीच्या वादातून केलेल्या हाणामारीत तरूणाचा मृत्यू झाल्याप्रकरणातील चार संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, एरंडोल येथे १२ मे रोजी सकाळी शेतीच्या वादावरून उमेश आबा महाजन (वय २८) या तरूणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. आबा भगवान महाजन यांचा त्यांचे भाऊ सुरेश, तुकाराम आणि मगन यांच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आबा महाजन यांना मारहाण करत असल्याचे पाहून त्यांचा मोठा मुलगा उमेश हा तिथे आला. याचा राग आल्याने सुरेश महाजन, तुकाराम महाजन, मगन महाजन, तुकारामचा मुलगा मनोज आणि पत्नी उषा बाई आणि इतरांना आबा महाजन आणि उमेश महाजन यांनाबेदम मारहाण केली. तर उमेशला गुप्तांगावर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताची आई सुनिता यांच्या फिर्यादीवरून जेठ तुकाराम भगवान महाजन, पुतण्या मनोज तुकाराम महाजन, जेठ सुरेश भगवान महाजन, पुतण्या अनिल सुरेश महाजन, जेठाणी उषाबाई तुकाराम महाजन सर्व रा. एरंडोल यांच्याविरोधात एरंडोल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यातील तुकाराम भगवान महाजन, मनोज तुकाराम महाजन, सुरेश भगवान महाजन व अनिल सुरेश महाजन यांना एरंडोल येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणात न्यायाधिशांनी सर्व संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.