दिपनगर प्रकल्पामुळे वातावरण दूषित; नागरीकांचे आरोग्य धोक्यात !

दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील दिपनगर परिसरातील 660 मे.वॅ. प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे स्थानिक रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीद्वारे उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील अपूर्ण कामांमुळे आजूबाजूच्या गावांमध्ये राख व प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दिपनगर येथील प्रकल्पाचे अनेक महत्त्वाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, वेळेत प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. शिवाय अधिकाऱ्यांनी प्रकल्प चाचणीपूर्वक सुरू केली आहे. परिणामी, प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात राख उडत असून परिसरातील हवा आणि मातीवर याचा गंभीर परिणाम होत आहे. शेतमालावर राखेचा थर साचल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. याशिवाय, हवेत सतत उडणाऱ्या राखेमुळे स्थानिक रहिवाशांना श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पाजवळील गावांमध्ये नागरिक ध्वनी प्रदूषणामुळेही त्रस्त आहेत. मोठ्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो आहे.

प्रकल्पातील एफ.जी.डी. (फ्ल्यू गॅस डिसल्फरायझेशन) यंत्रणा अद्याप कार्यान्वित नसल्याने प्रदूषण वाढले आहे. पर्यावरण मंत्रालयाने नवीन विद्युत प्रकल्पांना एफ.जी.डी. प्रणाली कार्यान्वित करणे अनिवार्य केले आहे. मात्र, प्रकल्प संचालकांनी ही यंत्रणा पूर्ण होण्याआधीच प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनाच्या तक्रारी वाढल्या असून, वातावरणातील राखेमुळे परिसरातील जीवनमान खालावत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान आणि जनतेच्या आरोग्याची हानी हे प्रकल्प व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाचे प्रत्यक्ष परिणाम आहेत.

महाजेनको प्रशासनाचा निष्काळजीपणा
प्रकल्पाच्या सुरुवातीपूर्वी महाजेनको प्रशासनाने स्थानिक ग्रामपंचायतींना किंवा नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. यामुळे अचानक सुरू झालेल्या प्रकल्पामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाने नागरिक भयभीत झाले आहेत. प्रकल्पासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला गेला असूनही, कामातील अक्षम्य चुका आणि अपूर्णता याकडे महाजेनकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दिपनगर परिसरातील नागरिकांमध्ये प्रकल्पाविरोधात संताप निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे लवकरच लेखी तक्रार दाखल केली जाणार आहे.

नागरिकांची प्रमुख मागणी म्हणजे प्रकल्पाचे सर्व अपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत प्रकल्प बंद ठेवावा आणि प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात आहे. दिपनगर प्रकल्पाच्या व्यवस्थापनातील त्रुटी आणि प्रदूषणामुळे स्थानिक जीवन धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना आरोग्य आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या समस्येवर तातडीने तोडगा निघाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Protected Content