यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात ढोल, ताशे व झांजच्या गजरात विद्यार्थ्यांनी विघ्नहर्ता श्री गणेशाची स्थापना केली.
बाल संस्कार विद्यामंदिरात पाच दिवसाच्या गणपती बाप्पाचे आज जल्लोषात आगमन झाले. शहराच्या मुख्य रस्त्यावरून शाळेच्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यानी आकर्षक वस्त्र परीधान करून ढोल ताशे झांजच्या सुमधुर तालावर नाचत गणरायाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला. शिक्षक सुनिल देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक श्री च्या मुर्तीची स्थापना करण्यात आली.
सुरुवातीला अशोक गडे यांच्या घरून श्री ची मुर्ती घेत विविध पथकांच्या सहभागाने मिरवणूक काढण्यातआली. यात झांज पथक, मुलांचे लेझीम पथक, मुलींचे लेझीम पथक, कळशी पथक व दांडिया पथक आदींचा समावेश होता.
विविध वेशभुषा केलेल्या पथकांनी ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले. मिरवणुक यशस्वी होण्यासाठी संस्थाध्यक्ष महेश वाणी, प्राथमिक मुख्याध्यापक सुनिल माळी, माध्यमिक मुख्याध्यापक अतुल गर्गे, ऊत्सव प्रमुख रामदास भिरूड यांचेसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी सहकार्य केले.