जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात (स्वायत्त संस्था) नव्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दि. २७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ही कार्यशाळा सातत्याने विविध उपक्रम आणि संवादात्मक सत्रांनी समृद्ध झाली होती.
या कार्यशाळेसाठी लढ्ढा अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक अमित लढ्ढा यांनी मार्गदर्शन केले. समारोप कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. नितीन भोळे (विभाग प्रमुख – बेसिक सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज), डॉ. तुषार कोळी (अधिष्ठाता), तसेच सर्व प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या आयक्यूएसी सेल आणि प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

एक आठवडाभर चाललेल्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकास, संवाद कौशल्य, टीमवर्क, नेतृत्वगुण, वेळ व्यवस्थापन, तणावनियंत्रण आणि प्रभावी सादरीकरण तंत्र या महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. गटचर्चा, भूमिकानाट्य, आत्ममूल्यांकन आणि इंटरॅक्टिव्ह गेम्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात लक्षणीय बदल दिसून आल्याचे प्राध्यापकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःचे अनुभव शेअर करताना या कार्यशाळेने त्यांच्यात आत्मविश्वास वाढविला, संवादकौशल्ये परिष्कृत केली आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्यात मदत केली, असे मत व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या नियोजन आणि समन्वयात डॉ. सरोज भोळे आणि शिक्षकवर्ग यांचे मोलाचे योगदान राहिले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी या यशस्वी उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.



