पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करतांना चुकीची माहिती दिल्याच्या कारणावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कोर्टाने चौकशीचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास यांनी केला होता. त्याबाबत कोर्टात एक याचिकाही दाखल करण्यात आली होती. आता याच याचिकेची दखल घेत न्यायालयाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. यामुळे त्यांच्या समोरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुणे न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या याचिकेची दखल घेत या प्रकरणी साक्षी पुरावे तपासण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन २००९, २०१४ आणि २०१९ साली ठाणे येथील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलामध्ये तफावत आहे, असे हरदास यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे. आता याचीच चौकशी होणार आहे.