जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात सद्यस्थितीत 2 लाख 56 हजार 599 एवढी लहान जनावरे असून 5 लाख 97 हजार 459 एवढी मोठी जनावरे आहेत. या एकूण 8 लाख 54 हजार 58 जनावरांना चारा आणि त्यांना आवश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुसंवर्धन विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यात जून अखेर पर्यंत जिल्ह्यातील पशुधनाला पुरेल एवढा चारा असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त शमाकांत पाटील यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील 8 लाख 54 हजार 58 जनावरांना रोज 4 हजार 354.55 मेट्रिक टन एवढा चारा लागतो तर महिन्याला 1 लाख 30 हजार 636.53 मेट्रिक टन एवढा चारा लागतो. तर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात उत्पादित होणारा खरीप आणि रब्बी मिळून एकूण चारा 23 लाख 99 हजार 548 मेट्रिक टन एवढा असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली असून त्यांच्या विभागामार्फत तालुकानिहाय चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी संकरीत ज्वारी सुगरगेजचे 909 किलो एवढे बियाणे वितरित केले असून संकरीत मका बियाणे 2000 हजार किलो वितरित करण्यात आल्याची माहिती दिली.
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत पशुपालकांना मुरघास बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही विभागाने सांगितले. गाई, म्हशी, बैल यांना पिण्यासाठी दिवसाला 35 ते 80 लिटर एवढे पाणी लागते. टंचाईग्रस्त भागातील जनावरांना पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही पशुसंवर्धन विभागाने सांगितले.