जळगाव (प्रतिनिधी) निसर्ग, सृष्टी निर्मितीचे मूळ म्हणजे पाणी, यासाठीच पाणी म्हणजे जीवन ही संकल्पना सार्थ ठरते. मात्र पाण्याचा होत असलेला अपव्यय आणि नासाडी तसेच मानवी अतिक्रमणामुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोतांवर होणारे विपरीत परिणामामुळे पुढच्या पिढीसाठी शुद्ध पाणी, शुद्ध हवा उरणार नाही. आगामी संकट परतवून लावण्यासाठी, पाण्याचा जपून वापर केला पाहिजे, पाण्याची नासाडी थांबवली पाहिजे, नळांना तोट्या बसविणे, घरातील सांडपाण्यातून परसबाग फुलविणे यासह विविध संवेदनशिल विषयांवर शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याव्दारे उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कृतितून पाण्याचा थेंब.. थेंब वाचविण्याचे प्रबोधन केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, नीर फाऊंडेशन, जलश्री आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जलसप्ताहानिमित्त आयोजीत पथनाट्य स्पर्धेच्या पहिला भागात शहरातील शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये प. न. लुंकड कन्या शाळा, विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल, ब. गो. शानबाग विद्यालय (लहान गट), नुतन मराठा स्कूल, ब. गो. शानबाग विद्यालय (मोठा गट) यांचा समावेश होता. पथनाट्याच्या पहिला भागात आज परिक्षक म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी श्रीपाद जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे उपस्थित होते. सुत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.
जल है तो कल है… चा जागर
वृक्षतोड, त्यामुळे मानवासमोर आलेले संकट, वातावरणातील बदल, पाणी टंचाईमुळे भविष्यात येणारे पाण्याचे संकट, त्यावर आतापासून करायाची उपाय सहभागी विद्यार्थ्यांनी पथनाट्याव्दारे सांगितले. पाण्याचा वापर जपून करून पुढच्या पिढीला जगण्याचा मार्ग दाखविण्याचे आवाहन करीत ‘जल है तो कल है’ चा जागर करीत रंजनातून संदेश दिला. यावेळी उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
आज पथनाट्य स्पर्धेचा दुसरा भाग
जलसप्ताहामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यामातून जल प्रबोधन सुरू आहे. यात आज दि.१९ मार्च ला पथनाट्य स्पर्धेचा दुसरा भागात अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूल, ला.ना. विद्यालयातील विद्यार्थी भाऊंचे उद्यान येथे सादर करणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशन, भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन, नीर फाऊंडेशन, जलश्री आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्यावतीने करण्यात आले आहे.