जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कारागृहातील बंदी यांचा भावनिक विकास होऊन सकारात्मक विचारसरणी रुजावी, यासाठी शासन विविध उपक्रम राबवत असते. समाजविघातक प्रवृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंदींचे समुपदेशन देशभक्तिपर गाण्यांच्या माध्यमातून व्हावे, तसेच संगीताच्या प्रभावी माध्यमातून त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर नेऊन त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागवावी, या उद्देशाने “जीवन गाणे गातच जावे” या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने जळगाव जिल्हा कारागृहात करण्यात आले.
जिल्हा कारागृहाच्या कला भवनात झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. जे. चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, खांडरे आदी उपस्थित होते.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अप्पर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यातील सर्व कारागृहांमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभक्तीपर गीतांनी भरले रंग
कार्यक्रमाची सुरुवात स्वर शुभम ग्रुपच्या प्रतीथयश कलाकार कपिल घुगे आणि सहकारी यांच्या सादरीकरणाने झाली. “इतनी शक्ति हमें देना दाता” या प्रार्थनेसह कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर विविध देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले. बंदी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना दाद दिली. “भारत मातेच्या जयघोषाने” संपूर्ण कारागृह दुमदुमून गेले. विशेष म्हणजे, कारागृहात बंदीवास भोगत असलेल्या दोन बंदिवान बांधवांनीही भक्तिगीत व देशभक्तिपर गीते सादर केली.
जळगावचे सुप्रसिद्ध लोकशाहीर शाहीर विनोद ढगे आणि त्यांची “दिशा काला पथक” संस्था यांच्यातर्फे पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून भारुड सादर करण्यात आले. व्यसनमुक्ती व सकारात्मक जीवनदृष्टी यावर भर देणाऱ्या भारुडाने उपस्थितांना विचार करायला भाग पाडले. स्वर शुभम ग्रुप व दिशा काला पथकाच्या १५ कलाकारांनी या कार्यक्रमात भाग घेतला.
कार्यक्रमाची सांगता स्वर शुभम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांच्या “है मालिक, तेरे बंदे हम” या गाण्याने झाली. कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, विनोद पाटील, आकाश भावसार, मनोज जैन यांनी मेहनत घेतली.