यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर आदिवासी समाजाचे कार्यकर्ते साहिल तडवी आणि त्यांचे सहकारी यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आमरण उपोषण प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर सोमवार, १८ मार्च २०२५ रोजी संपुष्टात आले. उपोषणादरम्यान प्रशासकीय गोंधळ आणि भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी लावून धरण्यात आली होती.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्यामार्फत आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भोजनाचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवण्यात अटी-शर्तींचा गोंधळ असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्याचबरोबर शाळा पातळीवरील निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला होता. या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी साहिल तडवी यांनी १७ मार्च २०२५ पासून कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांना पन्नालाल मावळे, रज्जाक तडवी आणि अन्य सहकाऱ्यांनी साथ दिली.
उपोषणादरम्यान प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्याशी उपोषणकर्त्यांनी सविस्तर चर्चा केली. प्रशासकीय कामकाजात असा गोंधळ खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडत उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मिळवले. या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणात साहिल तडवी यांच्यासह आदिवासी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मासूम रहेमान तडवी, मेरम तडवी, पन्नालाल मावळे, अकबर तडवी आणि प्रतिक्षा पाटील यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. उपोषणाच्या यशस्वी सांगतेनंतर कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष केंद्रित केले आहे.