नेहरू नगर येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा समारोप

जळगाव प्रतिनिधी । नेहरू नगर येथील गुरुदत्त मंदिरामध्ये अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद् संगीतमय भागवत कथेचे दि. १२ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. रविवारी १९ डिसेंबर रोजी सप्ताहाचा समारोप झाला.

दरम्यान, संत साह‌ित्य मानवासाठी प्रेरक असून श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. मानवी जीवनात अध्यात्मिक विकास महत्त्वाचा असून नैतिक व विवेकी आचरणाने तो साध्य करता येतो, असे मार्गदर्शन वृंदावन येथील भागवताचार्य हभप सोपानदेव महाराज आर्वीकर यांनी नेहरू नगर येथील अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा संगीतमय भागवत कथा  समारोप प्रसंगी केले. भागवताचार्य सोपानदेव महाराज यांचे काल्याचे किर्तन होऊन सप्ताहाचा समारोप झाला. सकाळी संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या समारोप प्रसंगी हभप सोपानदेव महाराज आर्वीकर यांनी काल्याचे किर्तनद्वारे भाविकांना प्रबोधित केले. यावेळी भाविकांच्या उत्साहामध्ये अखेरच्या दिवशी देखील खंड पडला नाही.

भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम भागवत कथा करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन हभप सोपानदेव महाराज यांनी केले.

प्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिक तथा नेहरू नगर प्रभागातील नगरसेवक तथा मनपाचे आरोग्य समिती सभापती जितेंद्र मराठे उपस्थित होते. दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. सप्ताह यशस्वी होण्यासाठी शिवराजे फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांनी परिश्रम घेतले.

 

 

Protected Content