Home Cities जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील समांतर रस्त्यासाठी अतिक्रमण हटविण्याची कारवाई

राष्ट्रीय महामार्गावरील समांतर रस्त्यासाठी अतिक्रमण हटविण्याची कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  राष्ट्रीय महामार्गावरील मुलींच्या आयटीआय परिसरातून प्रस्तावित समांतर रस्त्याच्या कामासाठी अखेर अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी कारवाई करत काही हॉकर्सच्या गाड्या जप्त केल्या. या कारवाईमुळे परिसरात काही काळ गडबड उडाली होती.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) माध्यमातून मुलींच्या आयटीआय येथून समांतर रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हॉकर्सनी अतिक्रमण केल्याने कामात अडथळा निर्माण होत होता. हा अडथळा दूर करण्यासाठी न्हाई प्रशासनाने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला संबंधित अतिक्रमणे काढण्याबाबत पत्र दिले होते.

त्या अनुषंगाने तीन दिवसांपूर्वी अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांनी सुमारे ७० ते ७५ हॉकर्सना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार काही हॉकर्सनी स्वयंस्फूर्तीने आपली गाडी व साहित्य हटविले.

सोमवार, ९ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण निर्मूलन पथकाने प्रत्यक्ष कारवाई करत आयटीआय मुलींच्या वसतिगृहापासून ब्रेन हॉस्पिटलपर्यंतचा परिसर तपासला. यावेळी अनेक हॉकर्सनी सहकार्य करत अतिक्रमण स्वतः काढून घेतले. मात्र प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या ६ ते ७ हॉकर्सच्या गाड्या जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती अधीक्षक संजय ठाकूर यांनी दिली.

या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समांतर रस्ता तयार झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आगामी काळातही अतिक्रमणाविरुद्ध अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

 


Protected Content

Play sound