Home Cities जामनेर जामनेरमध्ये ‘दुसरी मुलगी’ जन्माला प्रोत्साहन : ५ हजारांचे बक्षीस देत उपक्रमाची सुरुवात

जामनेरमध्ये ‘दुसरी मुलगी’ जन्माला प्रोत्साहन : ५ हजारांचे बक्षीस देत उपक्रमाची सुरुवात


जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । समाजातील मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी आणि ‘मुलगी जन्माला आली तर आनंद साजरा करावा’ हा सकारात्मक संदेश रुजावा या उद्देशाने जामनेर येथे एक अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मराठा समाजातील उद्योजक जगन्नाथ उर्फ आबासाहेब पाटील यांच्या पुढाकारातून ‘दुसरी मुलगी’ असलेल्या कुटुंबांना रोख बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली असून या उपक्रमाची उत्साहात सुरुवात झाली आहे.

या योजनेअंतर्गत जामनेर येथील पी. व्ही. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या कुटुंबाला दुसरी मुलगी झाल्याने प्रथम सन्मान देण्यात आला. आबासाहेब पाटील फाउंडेशनच्या वतीने या कुटुंबाला पाच हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. मुलीच्या जन्माचे स्वागत करत कुटुंबाचा सत्कार करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

समाजात अजूनही मुलगा-मुलगी भेदभावाची मानसिकता काही प्रमाणात अस्तित्वात असल्याने अशा उपक्रमांची गरज अधोरेखित होत आहे. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनासोबतच सामाजिक सन्मानही महत्त्वाचा ठरत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे कुटुंबांमध्ये सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमावेळी मराठा समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, समाजात मुलींचे स्थान अधिक भक्कम करण्यासाठी अशा पुढाकारांचे स्वागत केले. तसेच भविष्यात अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमामुळे ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या संकल्पनेला स्थानिक पातळीवर बळ मिळत असून समाजात मुलींबद्दल आदर आणि स्वीकार वाढण्यास मदत होत आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा प्रयत्न समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणारा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


Protected Content

Play sound