पाडळसरे धरणाबाबत अमळनेरकर जलसंपदा मंत्र्यांना जाब विचारणार ?

552288

अमळनेर (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन लवकरच महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी येथे येत आहेत. अमळनेरसह सहा तालुक्यातील जनतेने पाडळसरे धरणासाठी उभारलेल्या प्रदीर्घ आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जलसंपदा मंत्र्यांच्या या भेटीप्रसंगी मंत्र्यांच्या दौऱ्यात आयत्यावेळी भूमिका घेण्याचा निर्णय समितीच्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. स्थानिक जनतेच्या संवेदनशील प्रश्नांची ज्यांना कळकळ आहे, अश्या सेना-भाजप कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मेळाव्यात मंत्र्यांना पाडळसरे धरणाबाबत जाब विचारावा, असे जाहीर आवाहन जनआंदोलन समितीने केले आहे.

अमळनेर तालुक्यासह पारोळा, धरणगांव ,चोपडा ,धुळे, शिंदखेडा तालुक्यासाठी संजीवनी ठरणारा निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरणाबाबत महाराष्ट्र शासनाने आणि जलसंपदा मंत्र्यांनी मागिल चार वर्षात दुर्लक्ष केले आहे. जनआंदोलन समितीतर्फे या विषयावर १२ दिवस साखळी उपोषण, जाब विचारो आंदोलन, जलसत्याग्रह आंदोलन, केले होते. अनेक राजकिय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी संघटना, ग्रामिण जनतेने उत्स्फूर्तपणे या जनआंदोलनात सहभाग घेतला होता. राज्य शासनाने आणि जिल्ह्यातील जलसंपदामंत्री ना.गिरीश महाजन यांनी मात्र जन आंदोलनाबाबत कमालीची अनास्था दाखवली. त्यामुळे धरण जन आंदोलन समितीसह तालुक्यातील जनतेत तीव्र रोष आहे. समितीने ५ एप्रिल २०१८ ला काढलेल्या भव्य मोर्चाला ना. महाजन यांनी दूरध्वनीद्वारे संबोधित करतांना धरणासाठी २३०० कोटी रुपये देणार, असे जाहिर केले होते. मात्र मंत्र्यांनी शब्द न पाळल्याने समितीला शिवजयंतीपासून पुन्हा प्रदीर्घ आंदोलन उभारावे लागले आहे.

मागिल वर्षी एप्रिल महिन्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न करण्याच्या पार्श्वभूमीवर आता जलसंपदा मंत्री अमळनेरला येत आहेत म्हणून पाडळसरे धरण जन आंदोलन समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये संविधानात्मक मार्गाने विरोध करण्याची भूमिका घेण्याबाबत चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आला. याशिवाय ऐनवेळी गरजेनुसार समितीचे प्रमुख घेतील त्या भूमिकेप्रमाणे समितीचे पदाधिकारी कृती करतील, असेही बैठकीत ठरले. बैठकीत समितीचे प्रमुख मा.नगराध्यक्ष सुभाष चौधरी, मा.कुलगुरू प्रा.शिवाजीराव पाटील,एस.एम.पाटील, अजयसिंग पाटील, डी.एम.पाटील, सुनिल पाटील, रणजित शिंदे, महेश पाटील, देविदास देसले, रविंद्र पाटील, एन.के.पाटील, सुनिल पवार, आर.बी.पाटील, रामराव पवार, सतिष काटे, हेमंत भांडारकर, सुरेश सोनवणे, एस.यु.पाटील,
पुरुषोत्तम शेटे, सुनिल जाधव, वसंतराव पाटील आदिंसह समितीचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content