Home करियर माजी सैनिकांसाठी उद्या रोजगार व समुपदेशन मेळावा

माजी सैनिकांसाठी उद्या रोजगार व समुपदेशन मेळावा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । माजी सैनिक तसेच त्यांच्या अवलंबितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जळगाव आणि जिल्हा सैनिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष रोजगार व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार, दि. ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० या वेळेत मायादेवी मंदिरासमोर असलेल्या माजी सैनिक मायादेवी बहुउद्देशीय सभागृह, महाबळ, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात विविध उद्योगसंस्थांच्या प्रतिनिधींकडून इच्छुक उमेदवारांच्या जागेवर मुलाखती घेण्यात येणार आहेत. विशेषतः स्टार फॅबरीक्स आणि छबी इलेक्ट्रिकल या उद्योगांकडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असून, पात्र उमेदवारांची थेट निवड प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना नोकरीच्या संधी मिळण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी राज्य शासनाच्या महा-स्वयंम संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. तसेच ज्यांना ऑनलाइन नोंदणी करता येत नाही त्यांनी आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह, अनुभव प्रमाणपत्रांसह थेट मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संदीप ज्ञा. गायकवाड यांनी केले आहे.

या मेळाव्याच्या माध्यमातून माजी सैनिकांना रोजगाराच्या संधींसोबतच करिअरविषयक मार्गदर्शन आणि समुपदेशनही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त माजी सैनिक व त्यांच्या अवलंबितांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound