चाळीसगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीत येथील अपक्ष उमेदवार डॉ. विनोद कोतकर यांनी आजही (दि.१८) त्यांच्या प्रचाराचा झंझावात कायम ठेवला. त्यांनी मतदारांच्या भेटी-गाठींवर भर देत सकाळी त्यांनी दत्त मंदिर व गणेश मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराची सुरवात केली.
सिग्नल पॉइंट मार्गे, तहसील कचेरी, आडवा बाजार, गांधी चौक, सदर बाजार, आफु गल्ली, रथ गल्ली आडी भागात नागरिकांशी संवाद साधत डॉ. कोतकर यांनी व्यापार्यांशी हितगुज केले. विकासाच्या दृष्टीने आपली उमेदवारी असुन खर्या अर्थाने तालुक्याला पुनर्वैभव प्राप्त करून देत आदर्शवत तालुका घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यापार, उद्योग, शेती यासोबतच शिक्षण व महिला सबलीकरण तसेच समाजात भेडसावत असलेल्या अनेकविध समस्यांबाबत आपण कायम सजग असल्याचे सांगत तालुक्याची वैविध्यपूर्ण ओळख राज्यभरात व्हावी, असा तालुका घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्वासनही त्यांनी मतदारांना दिले.
सकाळी १०.०० वाजता निघालेल्या प्रचारफेरीत तरूणांसह महिलांचा मोठा सहभाग दिसुन येत होता. फुगा या निशाणीचे सर्वांनाच आकर्षण असुन सर्वत्र फुगा निशाणीची चर्चा दिसुन येत आहे. डॉ. कोतकर यांनी विकासाची भुमीका मतदारांसमोर ठेवत तालुक्याला सर्वार्थाने विकसित करण्याचे माझे व्हिजन असल्याचे सांगितले. डॉ. कोतकर यांची ‘आई फाऊंडेशन’च्या माध्यमातुन आपला समाजसेवेचा वसा कायम ठेवत महिलांच्या आरोग्य विषयक समस्यांच्या निराकरणासाठी विविध तपासण्यांची शिबीरे आयोजित करीत असतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपले समाजकार्य सुरु ठेवले आहे.