Home Cities जामनेर पहूर येथे पत्रकार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात ; खुशी गोंधळे व आदिती...

पहूर येथे पत्रकार दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात ; खुशी गोंधळे व आदिती पाटील प्रथम


पहूर (ता. जामनेर)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मराठी पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील अभिव्यक्ती कौशल्यांना व्यासपीठ देणाऱ्या उपक्रमांतर्गत पहूर शहर पत्रकार संघटनेने आयोजित केलेली केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी विचारमंथनपूर्ण मांडणी, आत्मविश्वास आणि प्रभावी भाषाशैलीच्या जोरावर स्पर्धेत रंगत आणली.

पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात शनिवारी (दि. ३) झालेल्या या स्पर्धेत एकूण ५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याध्यापक एस. आर. सोनवणे यांनी अध्यक्षस्थान भूषविले.

स्पर्धेत अ गट (इयत्ता ५ वी ते ८ वी) मध्ये डॉ. जे. जे. पंडित विद्यालय, लोहारा येथील खुशी कैलास गोंधळे हिने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकावर कीर्ती शरद पाटील (सावित्रीबाई फुले विद्यालय, पहूर) व कल्याणी मनोज पाटील (डॉ. जे. जे. पंडित विद्यालय, लोहारा) यांनी संयुक्तपणे बाजी मारली, तर तृतीय क्रमांक देवयानी दीपक सुरळकर (आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पहूर) हिने मिळविला. उत्तेजनार्थ मानवी सोपान पाटील (सावित्रीबाई फुले विद्यालय, पहूर) यांना गौरविण्यात आले.

ब गट (इयत्ता ९ वी ते १२ वी) मध्ये आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पहूर येथील आदिती विजय पाटील हिने प्रथम क्रमांक मिळवून प्रभावी वक्तृत्वाची छाप पाडली. द्वितीय क्रमांक अश्विनी ज्ञानेश्वर देशमुख (आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पहूर) हिने, तर तृतीय क्रमांक वैष्णवी नितीन किटे (सावित्रीबाई फुले विद्यालय, पहूर) हिने पटकावला. उत्तेजनार्थ गायत्री योगेश पवार (सावित्रीबाई फुले विद्यालय, पहूर) यांची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे प्रास्ताविक शरद बेलपत्रे यांनी केले. वेळाधिकारी म्हणून पी. टी. पाटील यांनी जबाबदारी सांभाळली. अ गटासाठी निवृत्त केंद्रप्रमुख दिनकर सुरळकर, महेश मोरे व मनोज खोडपे यांनी, तर ब गटासाठी निवृत्त मुख्याध्यापक व्ही. जी. भालेराव, आर. टी. देशमुख व डॉ. प्रशांत पांढरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार शांताराम आप्पा लाठे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालिका दिनानिमित्त पी. टी. पाटील यांनी सादर केलेली स्वरचित कविता विशेष आकर्षण ठरली. यावेळी सुधीर महाजन, विजय बोरसे, प्रकाश घोंगडे, अमोल घोंगडे, संतोष भडांगे, सरोजिनी वानखेडे, विद्या पाटील, विकास भिवसने आदी मान्यवर उपस्थित होते.

याच प्रसंगी पहूर येथील ५,००० हून अधिक कविता रचणाऱ्या कवयित्री रुपाली कैलास माळी यांच्या ‘काव्यांकुर’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त त्यांना ‘सावित्रीची लेक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच चिमुकली नेहा भिवसने हिला रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सर्व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

बक्षीस योजनेत प्रथम बक्षीस ₹१००१ प्रवीण कुमावत यांच्या सौजन्याने, द्वितीय बक्षीस ₹५०१ शरद बेलपत्रे व सौ. गीता भामेरे यांच्या सौजन्याने, तृतीय बक्षीस ₹२५१ रवींद्र लाठे व जयंत जोशी यांच्या सौजन्याने, तर उत्तेजनार्थ ₹१०१ मनोज जोशी यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहे. स्मृतीचिन्हे डॉ. संभाजी क्षीरसागर यांच्या, तर सन्मानपत्रे सौ. गीता भामेरे यांच्या सौजन्याने देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर, उपाध्यक्ष जयंत जोशी, रवींद्र लाठे, प्रविण कुमावत, ईश्वर हिवाळे यांच्यासह सर्व पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले. समन्वयक शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनकर सुरळकर यांनी निकाल जाहीर करून आभार मानले. मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांना रोख पारितोषिके, स्मृतीचिन्हे व सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानपत्रे प्रदान करण्यात येणार आहेत.

थोडक्यात, पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित या वक्तृत्व स्पर्धेने विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना देत पहूरमध्ये बौद्धिक व सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध केले.


Protected Content

Play sound