
धरणगाव (प्रतिनिधी) समाजातील गरीब व मागासवर्गीय विद्यार्थांना मोठ्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळावा म्हणून शासनाने शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार आरटीई अंतर्गत प्रवेश पद्धती सुरु केलीय. परंतू शासनाच्या मूळ उद्देशालाच हारताळ फासत गरीब व मागासवर्गीय विद्यार्थांना डावलून प्रक्रिया राबविली गेल्याचा धक्कादायक आरोप माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय जात, आठ हजारापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न वार्षिक असलेल्या विधवा,परीतक्ता किंवा फक्त आईवर अवलंबून असलेले मुलं, विकलांग, एचआयव्ही पॉझीटीव्ह मुलं,पालक तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८० हजारापेक्षा कमी किंवा बीपीएल श्रेणीत आहेत,अशी मुलं आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पात्र असतात. परंतू धरणगावात नुकतीच जाहीर झालेल्या आरटीई अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या यादीत चक्क श्रीमंत घरातील मुलं पात्र झाल्याचा आरोप श्री.वाघमारे यांनी लावला आहे.
धरणगावात नुकतीच जाहीर झालेल्या आरटीई अंतर्गत ११ विद्यार्थांच्या यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यादीत एकही मागासवर्गीय विद्यार्थाचा समावेश नाहीय. एवढेच नव्हे, तर सर्व विद्यार्थ्यांना फक्त एका विशिष्ठ शाळेतच नंबर लागल्याचे सांगण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांचे पत्ते बघितले असता, धक्कादायक चित्र समोर येते. धरणगाव शहराला लागून एरंडोल रस्त्याला लागून असेलेल्या उच्चभ्रू वस्तीत राहत असल्याचे अनेकांच्या पत्त्यावरून लक्षात येतेय. एखादं दोन विद्यार्थी सोडता बहुतांश विद्यार्थी सधन परिवारातील असल्याचे लक्षात येतेय.
दरम्यान, या संदर्भात तालुका शिक्षण अधिकारी व इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली असता शासनच्या जीआरमध्ये कोणत्या संवर्गातील विद्यार्थाला किती आरक्षण हे नमूद केले नसल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा नंबर लागला नसल्याचे धक्कादायक उत्तर देण्यात आले. दरम्यान, या सर्व प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे देखील श्री. वाघमारे यांनी म्हटले असून हा एकप्रकारे मागासवर्गीय विद्यार्थांवर अन्याय असल्याचे म्हटले आहे. आपल्याकडे अनेक पालकांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली असून बुधवारी जिल्हा शिक्षण अधिकारी यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार असल्याचे देखील श्री. वाघमारे यांनी सांगितलेले आहे.
तक्रारीसाठी टोल फ्री नंबर
आरटीई अंतर्गत कुठल्याही प्रकारची गडबडी होत असल्यास किंवा पात्र विद्यार्थ्यांना डावलेले जात असल्यास शिक्षा अभियानच्या 18001804132 या टोल फ्री नंबरवर तक्रार नोंदविता येते. एवढेच नव्हे तर, शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या आहे की, पालकांनी सादर केलेले विविध दाखल्यांची पडताळणी केल्यानंतरच अंतिम प्रवेश जाहीर करायचा असतो.