अकरावी पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चितीची मुदत ४ सप्टेंबरपर्यंत

 

मुंबई, वृत्तसंस्था । अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली गुणवत्ता यादी ३० ऑगस्टरोजी जाहीर झाली. मात्र कोरोना स्थितीमुळे या यादीत अलॉट झालेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करण्यास विलंब होत आहे. परिणामी प्रवेश निश्चितीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना नियमित फेरी १ मधील प्रवेश निश्चित करण्यासाठी ४ सप्टेंबररोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. नियमित फेरी – २ चे वेळापत्रकही शिक्षण विभागाने जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांला प्रवेशासाठी मिळालेल्या महाविद्यालयात त्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्याने आपल्या लॉगइनमध्ये Proceed for Admission क्लिक करणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून प्रवेश निश्चित करून घ्यावा आणि Admission Letter चं प्रिंट काढून ठेवावे. केवळ प्रोसिड केले म्हणजे प्रवेश झाला असे होत नाही, हे लक्षात घ्यावे. विद्यार्थ्यांनी चुकून ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’ पर्यायावर क्लिक केलं असेल तर त्यासाठी ‘Undo Proceed’ करण्याची सुविधा विद्यार्थ्यांनी लॉगीन मध्ये देण्यात आलेली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जायचे असेल किंवा त्यांना अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायचा असेल तर अर्ज मागे घेण्याच्या सुविधेचा वापर करावा. Withdrawal of Application केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा अर्ज सिस्टिममधून रद्द होईल. चुकून Withdrawal of Application चे बटण क्लिक केले असेल तर असे अर्ज पुन्हा UnWithdrawn करण्याची सुविधा शिक्षण उपसंचालक लॉगीनमध्ये देण्यात आलेले आहे.

नियमित फेरी – २ चे वेळापत्रक – ४ सप्टेंबर (रात्री १० वाजता) नियमित प्रवेश फेरी २ साठी रिक्त पदे दर्शवणे , ५ ते ७ सप्टेंबर नियमित फेरी – २ साठी विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम (भाग -२) भरणे सुरू, ८ ते ९ सप्टेंबर – डेटा प्रोसेसिंगसाठी राखीव वेळ , १० सप्टेंबररोजी १० वाजता – नियमित प्रवेश फेरी – २ ची गुणवत्ता यादी जाहीर करणे , १० सप्टेंबर सकाळी ११ ते १२ सप्टेंबरसायंकाळी ५ वाजेपर्यंत – दुसऱ्या यादीतील प्रवेश निश्चित करणे, १२ सप्टेंबर रात्री १० वाजता – प्रवेशाची नियमित फेरी – ३ साठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे.

पहिल्या यादीत कला शाखेतील १२ हजार ५०२, वाणिज्य शाखेतील ६६ हजार १४० आणि विज्ञान शाखेतील ३७ हजार ९७६ आणि एमसीव्हीसीच्या ९०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.

Protected Content